उरण (रायगड) - कोरोना काळात नागरिकांचे होत असलेले हाल, आर्थिक परिस्थितीचा विचार करता गट ग्रामपंचायत बांधपाडाचे उपसरपंच सुजित भालचंद्र म्हात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य रितेश सदानंद ठाकूर यांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. बांधपाडा, खोपटेमधील सर्व रहिवाशांचे, ग्रामस्थांचे २०२०-२१ या काळातील घरपट्टी माफ केले आहे. त्यामुळे असा ऐतिहासिक निर्णय घेणारी बांधपाडा गट ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
निर्णयाला ग्रामपंचायतीची मान्यता
खोपटे ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्नही भरपूर असल्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती चांगली होती.यादरम्यान घरोघरी जाऊन घरपट्टी वसुली करणे चालू होते. घरपट्टी भरणे ग्रामस्थांना शक्य नव्हते. त्यामुळे हे घरपट्टी घेणे त्वरित थांबविण्यात यावे, आणि २०२०-२१ या चालू वर्षातील घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावे. तसेच वसूल करण्यात आलेली घरपट्टी परत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे व ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी ग्रामसेवकांकडे केली होती. ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे या ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक ३० ऑक्टोबर २०२० रोजी सर्व सदस्यांच्या मदतीने घेण्यात आली. विषय क्रमांक १५ अन्वये ठराव क्रमांक ६३ द्वारे गट ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे हद्दीतील सर्व ग्रामस्थांचे २०२०-२१ दरम्यानची घरपट्टी माफ करण्यात आले.
घरपट्टी माफ करणारे राज्यातील पहिले ग्रामपंचायत
गट ग्रामपंचायत बांधपाडा क्षेत्रात असणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाच्या घरावर आकारण्यात येणारी २०२०-२१ या आर्थिक वर्षाची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने मासिक सभेत घेतले, अशी माहिती उपसरपंच सुजित म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी दिली. दरम्यान उपसरपंच सुजित म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य रितेश ठाकूर यांनी घरपट्टी माफ करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे. ग्रामपंचायत बांधपाडामधील या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे. घरपट्टी माफ करणारी गट ग्रामपंचायत बांधपाडा ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
हेही वाचा -चंद्रकांत पाटील यांनी कोट्यवधीचा घोटाळा केला, राष्ट्रवादीचा आरोप