रायगड - टाळेबंदीत शासनाने हळूहळू शिथिलता आणली असल्याने आता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. पर्यटनही हळूहळू सुरू झाल्याने समुद्रावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या एटीव्ही बाईक मालकांना सात महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे. त्यामुळे समुद्र किनारी आता एटीव्ही बाईकवर सवारी करताना पर्यटक दिसू लागले आहेत.
तब्बल सात महिन्यांनंतर शासनाने टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर पर्यटन क्षेत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील समुद्र किनारी पर्यटकांची रेलचेल सुरू झाली. पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने एटीव्ही बाईक व्यवसायिकांनी शासनाची परवानगी घेऊन पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. सात महिन्यानंतर समुद्र किनाऱ्यावर एटीव्ही बाईकस्वार पर्यटकांना घेऊन सफारी करताना दिसू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाईक सफारी करताना पर्यटकांनी मास्क लावूनच सफारी करणे बंधनकारक झाले आहे. यानंतर बाईक सॅनिटाइज करून पर्यटकांची सफर घडवली जात आहे. 'पर्यटकांची आणि स्वतःची काळजी घेऊनच आम्ही व्यवसाय सुरू केला आहे. शासनाने पुन्हा आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने, दिलासा मिळाला'. असे एटीव्ही बाईक मालक मंदार पावशे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - मोल मजूरी करणाऱ्या "फेसाटी"कार नवनाथ गोरेंना भारती विद्यापीठाकडून नोकरी