रायगड - पनवेलच्या कामोठेत घराबाहेर खेळणाऱ्या साडे चार वर्षीय मुलीचे अपहरण करणाचा डाव गावातील दक्ष नागरिकांनी हाणून पाडला. अपहरण करणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अजय निषाद (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे कामोठे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कामोठे सेक्टर १४ मध्ये राहणाऱ्या भगत कुटुंबातील ही मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी चिमुरडीला उचलून नेत होता. तेव्हो तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली. मुलीच्या ओरडण्याने बाजूलाच उभ्या असलेल्या सिद्धोम कांबळे आणि जय डिगोळे या कामोठेकर नागरिकांनी आरोपी तरुणास अडवून जाब विचारला. त्यांनी ताबडतोब आरोपीच्या ताब्यातून मुलीची सुटका केली.
त्यानंतर आरोपीला पकडून कामोठेकर नागिरकांनी बेदम चोप देत कामोठे पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करत आरोपी अजय याला अटक केली आहे. अधिक तपास कामोठे पोलीस करत आहे.