पेण (रायगड) - जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे हाहाकार मजला आहे. भारतातही या विषाणूवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजना करत असताना केंद्रासह राज्यशासनाला मदत म्हणून अनेक छोटे मोठ उद्योजक, अभिनेते, संस्था, मंडळे, आर्थिक मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील गणपती कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत दोन लाखाचा निधी दिला आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट; गृहप्रकल्प बांधकामाला सरकारच्या परवानगीनंतरही एमएमआरमधील काम बंदच !
चेक स्वरूपात त्यांनी हा निधी दिला आहे. या निधीचा धनादेश त्यांनी पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष कुणाल पाटील, अभय म्हात्रे, सचिन पाटील अशोक मोकल, बाळा पाटील आदी कारखानदार उपस्थित होते.