रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांच्या प्रचारादरम्यान वाटप करण्यात आलेल्या 'सिंहावलोकन' या पुस्तिकेच्या मुद्रकाविरुध्द अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारासाठी ही पुस्तिका वितरीत केली जात होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावतीने अॅड. सचिन जोशी यांनी या पुस्तिकेवर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नसल्यामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती. यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकारी अलिबाग यांना या प्रकरणाची चौकशी करून नियमोचित कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विजय सुर्यंवशी यांनी दिले होते.
यानंतर शिवसेना उमेदवार अनंत गीते यांचे यावर म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात त्यांचे अॅड. एन. टी. रातवडकर यांनी सदर पुस्तिकेच्या छपाईचे बिल आणि बिलाच्या प्रती सादर केल्या. सदरील पुस्तिका ही प्रचार साहित्य म्हणून सक्षम अधिकाऱ्याकडून परवानगी न घेता वितरीत झाली. त्यावर मुद्रक तसेच प्रकाशकाचे नाव नसल्याने ती छापून घेणारे अनिरुद्ध गांधी( रा. मालाड पश्चिम) आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस ( ५०१, गोरेगाव पश्चिम) यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ (क) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे.