रायगड - अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून मातीमिश्रित गढूळ पाणी नळावाटे येत असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अशुद्ध मातीमिश्रित पाणी पिण्याने नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे उमटे धरणाचे पाणी पिणाऱ्या नागरिकानी प्रशासनाला शुद्ध पाणी देण्याची मागणी ताजपूर येथील नागरिकांनी केली आहे.
१९८४ साली उमटे धरणाचे बांधकाम झाल्यानंतर ६२ गावातील नागरिकांना पाणी पिण्यास मिळाले. हे धरण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्पच नसल्याने मागील ३५ वर्षांपासून येथील नागरिक अशुद्ध पाणीच पीत होते. नव्याने उमटे धरणावर दीड कोटी खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता शुद्ध पाणी पिण्यास मिळेल, अशी आशा नागरिकांनी बाळगली होती. मात्र, प्रकल्प पूर्ण होऊन सुरू झाला तरी पाणी अशुद्धच येत आहे.
उमटे धरणातून जलशुद्धीकरण प्रकल्पामधून शुद्ध पाणी येणे अपेक्षित असूनही नागरिकांना अजूनही मातीमिश्रित अशुद्ध पाणीच नळावाटे येत आहे. हे अशुद्ध पाणी पिऊन घरातील व्यक्ती आजारी पडत आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यास द्या, अशी मागणी नागरिकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडे करावी लागत आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.