रायगड - अलिबाग मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो बोटसेवेची प्रतीक्षा आता संपणार असून महिन्याभरात ही बोटसेवा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्यामुळे अलिबागसह रायगडकरांची तीन वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात येणार असून अलिबागकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. रोरो बोटसेवेमुळे पर्यटनालाही चालना मिळण्यास सुरुवात होणार आहे. प्रोटो पोरोस एक्स व्ही ही अत्याधुनिक बोट ग्रीस बंदरातून निघाली असून दोन चार दिवसात मुंबईत दाखल होणार आहे. रोरो बोटसेवेमुळे प्रवासी आता आपली वाहने बोटीत टाकून येणार आहेत.
अलिबाग मांडवा ते भाऊचा धक्का येथून रोरो बोटसेवा सुरू होण्यासाठी सागरमाला अंतर्गत प्रकल्प कार्यन्वित करण्यात आला आहे. मांडवा बंदरात सुसज्ज अशी जेट्टी, प्रवासी तळ, ब्रेक वॉटर बंधारा, टर्मिनल अशी 130 कोटींची कामे दोन वर्षांपासून पूर्ण झाली आहेत. मात्र, प्रतीक्षा होती ती रो-रो बोटीची. एम2एम फेरीस लिमिटेड कंपनीला बोटीचा ठेका दिला असून कंपनीने अद्यावत अशी प्रोटो पोरोस एक्सव्ही ही बोट ग्रीसवरून मागवली आहे. या बोटीतून एकावेळी 50 वाहने आणि प्रवाशी नेण्याची क्षमता आहे.
ग्रीस येथून प्रोटो पोरोस एक्सव्ही बोट दीड महिन्यांपूर्वी निघाली असून आता भापताच्या अरबी समुद्रात दाखल झाली आहे. दोन ते तीन दिवसात ही बोट मुंबई किनाऱ्याला लागणार आहे. त्यानंतर साधारण महिन्याभरात अलिबाग मांडावा ते भाऊचा धक्का अशी रोरो बोटसेवा सुरू होणार आहे. अलिबाग ते मुंबई हे 125 किमी रास्तेमार्गे अंतर असून साधारण चार तास अवधी वाहनाने लागतो. मात्र, रोरो बोटसेवेमुळे समुद्रमार्गे वाहनांसह प्रवासी एक तासात अलिबागमध्ये दाखल होणार आहे. या सुविधेमुळे पर्यटकांची संख्याही मोठया प्रमाणात वाढणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे.
रोरो बोटसेवा दृष्टीक्षेपात येत असताना मांडवा बंदरात साचलेला गाळ काढण्याचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे तीन वर्षे प्रतिक्षेत असलेला रो-रो बोटसेवा प्रकल्प आता लवकरच सुरू होणार असल्याने अलिबागकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.