रायगड - जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले आहे. मात्र, वीज महामंडळाच्या कारभाराने सध्या रायगडकर हैराण झाले आहेत. तुरळक पाऊस, वारा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक भागातील वीज जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या अलिबागमधील नागरिकांनी आज महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. आठ दिवसात समस्या सुटल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे महावितरणाला देण्यात आला.
पूर्व मान्सून पावसाळा सुरू होताच विजेचा लपंडावही सुरू झाला आहे. अलिबाग तालुक्यातील वीज पुरवठा रोज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणबाबत संताप व्यक्त होत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी महावितरण मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी कार्यकारी अभियंता एम. एम. तपासे यांच्याकडे आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
दर मंगळवारी वीज ताराजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी तालुक्यातील वीज पुरवठा बंद केला जातो. मात्र, तरीही पाऊस व वारा सुटल्यानंतर तारेवर फांदी पडून वीज जाते. त्याचबरोबर लोड वाढल्यानंतरही महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. तर अनेक भागात डीपी तसेच विजेची कामेही अपुरे असल्याबाबतचा जाब दिलीप भोईर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता एम एम तपासे यांनी विचारला. तर उपस्थित नागरिकांनीही आपल्या समस्या सांगून जाब विचारला.
कार्यकरी अभियंता एम एम तपासे यांनी महावितरणची परिस्थिती सांगून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली. दिलीप भोईर यांनी आठ दिवसात विजेबाबतची समस्या सुटली नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. यावेळी अलिबाग पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.