रायगड- उन्हाच्या झळा वाढल्याने निघणाऱ्या घामाचा धारांनी अलिबागकर हैराण झालेले आहेत. मात्र, त्याचबरोबर महावितरणकडून पुरवण्यात येणाऱ्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने अलिबागकरांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. महावितरणच्या विजेच्या लपंडावाचा त्रास हा अलिबागकारांना नेहमीच सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट घोघांवत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील तापमानही वाढले असून उन्हाचे चटके लागत आहेत. अलिबागमध्ये वारंवांर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण विरोधात संतापाची लाट पसरली आहे. मात्र,याकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीकडून विजेच्या तारेवर आलेल्या झाडाच्या फांद्या काढण्याचे तसेच जुने पोल, तारा बदलण्याचे मेंटनन्सचे काम सुरू आहे. यासाठी मंगळवार आणि शुक्रवारी दिवसभर भारनियमन केले जाते. मात्र, अलिबागमध्ये रोज दोन ते तीन तास वीज जात असते. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी भारनियमन केले जात असतानाही रोज वीज का जाते असा प्रश्न अलिबागकारांना पडला आहे.
वीजेचे अनेक पोल, तारा तसेच इतर साहित्य हे जीर्ण झाले असून ते दीनदयाळ योजनेतून बदलण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी वीज जाण्याचे प्रकार घडत असले तरी ते त्याठिकाणची वीज सुरू करण्यात येत आहे, असे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांनी सांगितले