रायगड - अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि मोबाईल पुरविणे पाटील यांना चांगलेच महागात पडले. खाते निहाय चौकशीनंतर आंबादास पाटील यांच्यावरती कारवाई झाली आहे. तसेच तपासात त्यांनी अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबादास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई जेल महानिरीक्षक यांनी केली आहे. याआधी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामीची बडदास्त ठेवणे पाटील यांच्या नोकरीवर बेतले आहे.
अर्णब यांना अलिबाग नगरपरिषद शाळेत ठेवले होते-
रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा यांना 4 नोव्हेबर रोजी मुंबई येथून अटक केली होती. अलिबाग न्यायालयाने तीघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णबसह नितेश आणि फिरोज याना अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले होते. याठिकाणी अलिबाग जिल्हा कारागृहाचे पोलीस तैनात करण्यात आले होते.
आंबदास पाटील यांनी मोबाईल दिल्याचा कर्मचाऱ्यांनी केला होता आरोप-
6 नोव्हेबर रोजी अर्णब गोस्वामी यांना जेल पोलिसांनी मोबाईल पुरविला असल्याचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अर्णबसह दोघांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले. मात्र अर्णब याला मोबाईल पुरविल्याबाबत त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार अनंत डेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे यांच्यावर कारागृह अधीक्षक आंबदास पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर या दोन्ही कर्मचारी यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक पाटील यांनीच मोबाईल आणि इतर सुविधा पुरविल्याचा आरोप केला होता.
पाटील यांनीच पुरविला मोबाईल-
अर्णब गोस्वामी मोबाईल प्रकरणाची खातेनिहाय चौकशी जिल्हा कारागृह अधीक्षक आंबदास पाटील यांचीही सुरू झाली होती. खातेनिहाय चौकशी मध्ये पाटील यांनीच अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरविल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
4 नोव्हेंबरला झाली होती अटक-
राज्याच्या गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने ४ नोव्हेंबरला रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. त्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली. २०१८ सालच्या एका आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर अर्णब यांची अलिबाग कारागृहात रवानगी झाली. दरम्यान, त्यांना जेलमध्ये मोबाईल पुरविण्यात आला होता. याप्रकरणी अलिबाग करागृहाचे अधिक्षक आंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण..
२०१८च्या मे महिन्यात अन्वय नाईक (५३) या इंटेरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. त्याच्यासोबत त्याच्या आईनेही आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांना अन्वय नाईक यांनी लिहिलेली आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी समोर आली होती. या चिठ्ठीमध्ये अन्वयने अर्णब गोस्वामीवर आपले पैसे थकवल्याचा आरोप केला होता. अर्णबने आपले ५.४० कोटी रुपये थकवल्यामुळे आपण आर्थिक संकटात आल्याचा या चिठ्ठीत उल्लेख होता.
सीआयडी चौकशीचे आदेश...
२०२०च्या मे महिन्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. अन्वय नाईक यांची मुलगी अज्ञा नाईकच्या मागणीवरुन हे आदेश देण्यात आले होते. अलीबाग पोलिसांनी याप्रकरणी अर्णब गोस्वामीचा तपास केला नसल्याचा आरोप अज्ञा यांनी केला होता.
हेही वाचा- मुंबईत काँग्रेसचे आंदोलन, निर्मला सीतारामन यांच्याविरोधात घोषणाबाजी