रायगड - अमेरिका पनामामध्ये आयोजित मिस टीन युनिव्हर्स २०१९ या सौंदर्य स्पर्धेमध्ये अलिबागची मुलगी अपूर्वा ठाकूर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अपूर्वाला देशभरातून मोठया प्रमाणावर पाठींबा मिळत असून मिस टीन युनीव्हर्सच्या वेबसाईटवर हजारो लोकांनी पाठींबा दर्शवण्यासाठी आपले मत दिले आहे. भारतातील लोकांनी असेच प्रेम कायम ठेवून ३० मार्चपर्यंत मिस टीन युनीव्हर्सच्या वेबसाईटवर आपला पाठींबा देण्यासाठी मत करण्याचे आवाहन अपूर्वाने केले आहे.
अपूर्वा सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील थॉमस जेफरसन विद्यापीठातील बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचा अभ्यास करत आहे. मिस टीन युनिव्हर्स स्पर्धा २४ मार्चपासून होणार असून ३० मार्चला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. यावर्षी २८ वेगवेगळया देशांतील स्पर्धक सौंदर्यवती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश आहे.
अपूर्वाने मिस टीन इंडिया युनिव्हर्सचा किताब डिसेंबर २०१८ मध्ये जिंकला होता. नोएडा येथील मिस जसमीत कौर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मिस टीन युनिव्हर्स इंडियाच्या आयोजनाचे श्रेय मिस टीन इंडिया ऑर्गनायझेशनच्या जसमीत कौर यांचे आहे. त्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना बनवली होती.
मिस टीन युनिव्हर्स या जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करायाला मिळणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी खूप उत्साहीत असून मेहनत करणार असल्याचे अपूर्वाने सांगितले. सर्व भारतीयांच्या शुभेच्छा पाठीशी असल्याने ही स्पर्धा जिंकण्याबद्दल आत्मविश्वास असल्याचेही ते म्हणाले.
जसमीत कौर यांनी सांगितले, की अपूर्वा एक अतिशय हुशार तरुणी आहे. मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी आवश्यक असलेले गुण अपूर्वामध्ये आहेत. अपूर्वासाठी विशेषतज्ज्ञांनी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यामुळे ती ही स्पर्धा जिंकून आपल्या देशाचे व कुटुंबाचे नाव रोशन करेल, असा विश्वास कौर यांनी व्यक्त केला आहे.