रायगड - पहिला पाऊस माथेरानमध्ये आनंदाचे शिंपण करतो. मातीचा गंध, दाट धुके याबरोबरच जंगलात उगवणारी अळंबी हे माथेरानच्या पहिल्या पावसाचे वैशिष्ट्य. पावसाचे आगमन झाल्यापासून पुढचे दोन ते तीन आठवडे माथेरानच्या जंगलात हे निसर्गाचे देणे असलेली अळंबी दिसते.
पहिल्या पावसात खवय्यांसाठी पर्वणी
पाऊस पडला की जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये ही अळंबी उगवते. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या अत्यंत छोट्या छत्रीच्या आकाराच्या अळंबीची चव जिभेवर रेंगाळत राहते. तज्ज्ञांच्या मते अळंबी ही हरितद्रव्यविरहित बीज धारण बुरशी आहे. अळंबीस भूछत्र असेही म्हणतात. पुरातन काळापासून संस्कृतमध्ये 'कुसूंप' आणि पौराणिक ग्रंथात भूछत्र म्हणून अळंबीचा उल्लेख आढळतो. अळंबीविषयी 'कुत्र्याची छत्री' अशी चुकीची कल्पना अजूनही काही लोकांच्या मनात आहे. अळंबीचे काही विषारी प्रकार वगळता हा शक्तिवर्धक आणि औषधीयुक्त आहार आहे. पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, कुजणाऱ्या पालापाचोळ्यावर, झाडाखाली अळंबी उगवते. तिचे नानाविध प्रकार आहेत. अळंबीच्या काही जाती या विषारी देखील आहेत.
अळंबीचा आहारामध्ये समावेश
माथेरानच्या जंगलात पावसाळ्याच्या पहिल्या हंगामात आढळणारी अळंबी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. दाट जंगलामध्ये ती उगवते. अळंबीचे फूल पूर्ण उमलण्यापूर्वी जी अळंबी असते तीला मोठी मागणी आहे. पावसाळ्यात माथेरानमध्ये बहुतांश घरात जेवणात अळंबीचा बेत हमखास असतो. सध्या माथेरानच्या जंगलात ठिकठिकाणी अळंबी उगवली आहे. सकाळी जंगलात जाऊन अळंबी आणणे हा अनेक माथेरानवासीयांचा दिनक्रम झाला आहे. अळंबी उगवण्याची प्रक्रिया सुरू होताना सुरुवातीला बारीक तुरा असतो, नंतर त्याची अंडी तयार होतात आणि नंतरची प्रक्रिया म्हणजे अळंबीचे बारीक कळ्यांमध्ये रुपांतर होते. ज्याने एकदा अळंबी खाल्ली, तो पुढच्या वर्षी हमखास तिची वाट पाहतो. मुंबईतील अनेक माथेरानकरांना ही अळंबी आवर्जून पाठवली जाते, अशी प्रतिक्रिया गृहिणी रिजवाना अनिस शेख यांनी दिली आहे.
हेही वाचा -दिलासादायक : मुंबईत जंबो कोविड सेंटरमध्ये ९० टक्के बेड रिक्त