रायगड - सत्य हे कधीना-कधी बाहेर येतच असते. नेहमी सत्याचाच विजय होतो. सत्यासाठी सर्वांनी आमच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी जनतेला केले आहे. दिवंगत इंटेरिअर डिझायनर यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलही अद्या नाईक या दोघींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
नाईक माय-लेकी सत्र न्यायालयात हजर -
जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलिसांनी पुनर्विचार याचिका केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी दोघी जिल्हा सत्र न्यायालयात हजर होत्या.
दोघी माय-लेकींना पोलीस संरक्षण -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा, फिरोज शेख या तिघांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरून भाजपाने आक्रमक धोरण घेतले आहे. सध्याची परिस्थिती बघता अक्षता नाईक आणि मुलगी अद्या नाईक यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
अर्णबचा जामीन अर्ज फेटाळला -
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळला. शनिवारी दिवसभर सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. जामीन अर्ज फेटाळल्याने अर्णबचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. तेव्हा पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणात रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना अटक केली आहे. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यावर योग्य तपास केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरेश वराडे यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.