पनवेल - उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आता खुद्द अजित पवार यांनीच पनवेलमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने पार्थ पवार यांच्या प्रचाराला आणखी जोर चढला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आपला मुलगा पार्थ पवार याच्या विजयासाठी अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली असून याची सुरुवात त्यांनी पनवेलमधून केली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांच्यासाठी खुद्द त्यांचे वडील अजित पवार यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार हे गेले ६ महिने संपर्क दौरे करत आहेत. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क तयार झाला आहे. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आता अजित पवारदेखील मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अजित पवार सध्या पनवेल दौरा करीत आहेत.
अजित पवार यांनी बुधवारी पनवेल येथे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागा, असे आवाहन देखील कार्यकर्त्यांना केले. मात्र, बैठकीत बोलताना त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले नाही. कार्यकर्त्यांनी मनात कसलीही शंका न ठेवता निवडणुकीच्या कामाला लागावे. पक्षाकडून जी मदत लागेल ती मिळेल असे, वक्तव्य देखील यावेळी अजित पवार यांनी केले.
या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसेच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्या मागे उभी राहणारी कार्यकर्त्यांची ताकद या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी संभाव्य उमेदवार आणि नव्या जुन्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमे, संपर्क यंत्रणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सांगड घालून सर्व शक्ती पणाला लावण्यात सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.