पेण-(रायगड) आगरी समाजाला सरस्वतीचे दर्शन फार उशिरा झाले. मात्र त्यांंनी एकलव्याप्रमाणे विद्याग्रहण केले आहे. प्रगतीची नवनवी क्षितिजं पादाक्रांत केली आहेत. आज समाजात शिक्षणाचा प्रसार मोठ्याप्रमाणावर झाला आहे. आर्थिकदृष्ट्याही आगारी समाज बऱ्यापैकी संपन्न झाला आहे. मात्र दुसरीकडे वाढू लागलेला औद्योगिक विकास आणि उभ्या राहिलेल्या अजस्र नागरी वसाहतीमुळे आगारी समाजाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई, नैना, स्वप्ननगरी अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सरकारकडून मूळनिवासी असलेल्या आगरी माणसालाच सातत्याने विस्थापित करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा सूर पेण येथे झालेल्या आगरी वकील-डाॅक्टरांच्या परिषदेतून उमटला आहे.
अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने पेण येथील आगरी समाज सभागृहात आगरी वकील-डाॅक्टरांची संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. या विचारमंथन परिषदेत वकील-डॅक्टरांनी समाजाच्या अधोगतीची साधार भीती व्यक्त केली. अनेक उणिवांची, विविध समस्यांची, नाना प्रश्नांची उकल होणे काळाची गरज आहे. असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. सर्वच समाज एकसंघ झाले असून, ते आपापल्या मागण्यांसाठी झगडत आहेत. मात्र एकमेव आगरी जात तेवढी अजूनही निंद्रिस्त आहे. त्यांनी वेळीच जागे झाले पाहिजे. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी झगडावे असे आवाहन या परिषदेमधून समाजाला करण्यात आले आहे.
परिषदेला आगारी समाजातील मान्यवरांची उपस्थिती
परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील हे होते. तर उद्घाटन अलिबागच्या आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी न्यायाधीश डी.पी.म्हात्रे, पेण बार असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, पेण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन नाईक, समाजसेवी डाॅक्टर सिध्दार्थ पाटील, भिवंडीचे आगरी कोळी मेडिकोजचे डाॅ. तपन पाटील, अलिबागचे डाॅ.विनायक पाटील, डाॅ.महानंदा म्हात्रे, ऍड. स्मिता धुमाळ, ऍड.पुष्कर मोकल, डाॅ.तुषार गावंड, सुरेश पाटील, संजय ठाकूर, ऍड. राजश्री गावंड, ऍड. के.एस.पाटील यांची उपस्थिती होती.