रायगड - रायगड जिल्ह्यातील माथेरान आणि किल्ले रायगड परिसरात कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी किल्ले रायगड आणि थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान ही दोन पर्यटनस्थळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांसाठी खुले केले आहेत. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे. त्यामुळे दोन्ही पर्यटनस्थळांवर पर्यटकांची पावले वळणार आहेत. किल्ले रायगड आणि माथेरान ही पर्यटनस्थळे तीन महिन्यानंतर आता पुन्हा पर्यटकांनी बहरणार आहेत. दरम्यान, डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. तर दुसरीकडे पर्यंटनस्थळे सुरू केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
- कोरोनामुळे तीन महिन्यांपासून पर्यटन होते बंद -
मार्च 2021 पासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद केली. किल्ले रायगड, थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान ही पर्यटनस्थळेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा तीन महिन्यात घट्ट झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनाने जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ९.७७ एवढा झाला आहे. मात्र, अद्यापही तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने रायगड जिल्हा हा चवथ्या टप्प्यात ठेवण्यात आला आहे.
- माथेरान, किल्ले रायगडवर पर्यटन सुरू-
जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान आणि किल्ले रायगड ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. लाखो पर्यटक माथेरान थंड हवेच्या ठिकाणी तर स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाला भेट देत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. माथेरान आणि किल्ले रायगड येथील स्थानिकांचा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटकांवर येथील अर्थव्यवस्था आहे. माथेरान नगरपरिषद हद्दीत लसीकरण ही मोठ्या प्रमाणात झाले आहे. तर किल्ले रायगड पर्यटनास खुले करण्याची मागणी शिवप्रेमी कडून केली जात आहे. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी परिस्थिती पाहून पर्यटन स्थळे खुली करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यादृष्टीने माथेरान आणि किल्ले रायगड ही दोन पर्यटन स्थळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्यामुळे तीन महिन्यानंतर माथेरान आणि किल्ले रायगडवर पर्यटकांची पावले वळू लागणार आहेत.
- स्थानिक व्यावसायिक आनंदी -
किल्ले रायगड आणि माथेरान ही जिल्ह्यातील दोन पर्यटनस्थळे नेहमी पर्यटकांनी बहरलेली असतात. त्यामुळे येथील स्थानिक व्यवसायिकांनाही आर्थिक फायदा होत असतो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने स्थानिक व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी किल्ले रायगड आणि माथेरान ही दोन्ही पर्यटन खुली करण्याची अधिसूचना काढली असल्याने आता येथील पर्यटन सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक पर्यटन सुरू होत असल्याने आनंदित झाले आहेत.
- या नियमांचे पालन करा -
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशान्वये पाचव्या टप्प्यातील असलेल्या पर्यटकांना माथेरान आणि किल्ले रायगडावर इ पास शिवाय येण्यास बंदी आहे. पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकांना हॉटेलमधील अंतर्गत खेळ, स्विमिंग पुलावर जाण्यास बंदी आहे. मोकळ्या जागेत व्यायाम, सायकलीग करण्यास परवानगी आहे. पर्यटकांनी आणि हॉटेल व्यवसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उपहारगृहे ही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून येणाऱ्या पर्यटकांसाठी खुली राहणार आहेत. हॉटेल अस्थापनातील कर्मचारी याची आरटीपीसीआर तपासणी करणे अनिर्वाय आहे. अन्यथा प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. येणाऱ्या पर्यटकांची थर्मल स्क्रिनींग करणे अनिर्वाय आहे. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची नोंद करणे गरजेचे आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला आहे. माथेरान नगरपरिषद हद्दीत लसीकरण मोठया प्रमाणात झाले आहे. किल्ले रायगडावर जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रेमी आणि पर्यटक यांच्याकडून वारंवार होत होती. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून माथेरान आणि किल्ले रायगड ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.