रायगड - शेती आणि बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या पनवेलमधल्या एका शेतकऱ्याने सोमवारी थेट 'मातोश्री' गाठत आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडुन दखल घेण्यात आली. या संदर्भात तहसीलदांरासह कृषिमंत्र्यांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र, या बैठकीत चर्चा की केवळ बँकेच्याच बाजूने झाली असून, आपले म्हणणे कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही, अशी तक्रार त्यांनी केली.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल; अखेर 'त्या' चिमुकल्यांची थंडीपासून सुटका
बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी मधुकर देशमुख हे आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत मातोश्रीवर आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात नेले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: दखल घेत, त्यांना सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी बँकेच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांची आणि देशमुख यांच्यासोबत समोरासमोर चर्चा घडवून आणली. त्यानंतर सायंकाळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबतही एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र, यावेळी बैठकीत केवळ बँकेच्या बाजूनेच चर्चा करण्यात आली असा आरोप यावेळी देशमुख यांनी केला आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी.