रायगड - ढोल- ताशाचा गजर,थरावर थर चढवणारे गोविंदा, शिट्टीच्या आवाजातील शिस्तबद्ध हालचाली आणि तोल सांभाळत शेवटच्या थरावर चढणारा गोविंदा.... या वातावरणात साई तेज प्रतिष्ठानची दहीहंडी पार पडली. पूरग्रस्तांबाबत सामाजिक भान जपून मोठ्या आयोजकांनी दहीहंड्या रद्द केल्या होत्या. यामुळे सकाळपासून गोविंदामध्ये काही प्रमाणात निराशा होती. मात्र, रात्री साईतेज प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये सिने अभिनेता अंकुश चौधरीने गोविंदाना दुनियादारी चित्रपटाच्या गाण्यांवर थिरकायला लावले.
महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांच्यातर्फे साईतेज प्रतिष्ठानच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमधील या दहीहंडी उत्सवात अंकुश चौधरीने आपल्या परफॉर्मन्सवर सर्वांनाच नाचवले. अभिनेता अंकुश चौधरी समोर गोविंदानी त्याच्या गाजलेल्या अनेक डायलॉग्सची फर्माईश केल्यावर अंकुशने अनोख्या अंदाजात चित्रपटातील डायलॉग्स बोलून दाखवले.
पनवेलमध्ये स्वागत करण्यासाठी स्थानिकांनी अंकुश चौधरीला एक मानाची टोपी भेट दिली. ती पाहून अंकुशला दगडी चाळ या चित्रपटाची आठवण झाल्याचे त्याने सांगितले.

अनेक दहीहंड्या रद्द झाल्याने गोविंदाचा दहीहंडी उवाचा जल्लोष कमी होऊ नये म्हणून यांनी दहीहंडी उत्सवावरील खर्च कमी केला. पनवेल महापालिकेचे सभापती तेजस कांडपिळे यांनी दहीहंडी उत्सवावरील खर्च पूरग्रस्तांसाठीच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अभिनेता अंकुश चौधरी यांनी कौतुक केले.
यावेळी माजी खासदार राम ठाकूर, महापौर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा प्रवक्ता वाय.टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अॅड. मनोज भुजबळ, जगदिश गायकवाड, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.