रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर रसायन घेऊन जाणारा टँकरला कशेडी घाटात अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून रसायन गळती सुरू झाली. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र रसायन ज्वलनशील नसल्याने महामार्ग पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू केली आहे. तर, अडकलेला टँकर बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

सुरत येथून एसीएम हे केमिकल घेऊन टँकर चिपळूण येथील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत चालला होता. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव येथे टँकर आला असता, तो मातीत अडकून अपघात झाला. दरम्यान, जेसीबीच्या सहाय्याने हा टँकर बाहेर काढताना टँकरवरील रसायन टाकी लीक होऊन त्यातून रसायन गळती सुरू झाली.
मुंबई-गोवा महामार्गावर रसायन गळती झाल्याची माहिती मिळताच महाड औद्योगिक अग्निशमन दल आणि रसायन तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. टँकर मध्ये एसीएम हे रसायन असून त्याचा कलरमध्ये वापर करण्यात येतो. हे रसायन धोकादायक नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.