रायगड : रत्नागिरीत होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प राज्य शासनाने रद्द केला आहे. त्यानंतर हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात चणेरा भागात येणार अशी चर्चा मध्यतरी रंगली होती. नाणार प्रकल्प रायगडात होणार, अशी राज्य शासनाने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रकल्पाचा अजून पत्ता नसतानाही रायगडात मात्र, नाणारला विरोध होत असल्याचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 15 हजार एकर जमिनीवर नाणार प्रकल्प उभा राहणार होता. यासाठी भूसंपादन प्रक्रियाही करण्यात आली होती. स्थानिक भूमिपुत्रांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केल्यानंतर हा प्रकल्प राज्य शासनाने रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यातील चणेरा भागात येणार असल्याबाबत चर्चा निर्माण झाली. मात्र, रायगडात नाणार रिफायनरी प्रकल्प येण्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीही अधिसूचना वा अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनालाही कोणतीच कल्पना नाही.
रायगड जिल्ह्यातील चणेरा भागात सिडकोचे नवेनगर औद्योगिक क्षेत्र प्रकल्प होत आहे. यासाठी रोहा, श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड तालुक्यात साधारण 40 गावांचा समावेश आहे. यासाठी 19 हजार हेक्टर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे. शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली असली तरी अजून भूसंपादन वा जनसुनावणी झालेली नाही. तसेच सिडकोच्या या प्रकल्पात काय होणार? याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रत्नागिरीमधील नाणार प्रकल्प रद्द केल्यानंतर पुन्हा अधिवेशनात नाणारबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने नाणार रायगडात होणार की, अन्यत्र हलविणार याबाबत कोणतीही माहिती नाही. रायगड जिल्हा प्रशासनालाही याबाबत अधिकृत माहिती नाही. तरी जिल्ह्यात न येणाऱ्या प्रकल्पाला विरोध होण्यास सुरुवात झालेली आहे. चणेरा विभाग हा मागासलेला भाग असून याठिकाणी नाणार येत असेल तर स्वागत आहे, असे मत येथील स्थानिकांचे आहे.
रत्नागिरीत येणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. रायगडमध्ये नाणार प्रकल्प येत असेल तर माझा त्याला ठाम विरोध राहील. याबाबत आज बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाची भूमिका मांडू, असे माजी खासदार अनंत गीते यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प रायगडात येत असेल तर आमचा त्याला तीव्र विरोध राहणार आहे. जिल्ह्यात नवे प्रकल्प यावेत अशी आमची भूमिका आहे. मात्र आम्हाला रासायनिक प्रकल्प नको आहेत, असे सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या.