रायगड - उरण तालुक्यातील दिघोडे गावाजवळ पाण्याची पाइपलाइन फुटली फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. 80 फूट उंच पाण्याचे फवारे उडाले असून रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. पाणी पाइपलाइन फुटल्याने हजारो ग्रामस्थांचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी सात ते आठ तास लागणार असल्याची शक्यता बोलली जात आहे.
80 फूट उंच पाण्याचा फवारा
दिघोडे गावाजवळ फुटली पाइपलाइन सिडकोच्या हेटवणे धरणातून नवी मुंबईकडे पिण्याची पाइपलाइन जात आहे. आज दिघोडे गावाजवळ ती फुटल्याने आकाशात 80 फूट उंच पाण्याचा फवारा उडाला. त्यामुळे परिसरात अक्षरक्ष ढोपराभर पाणी साचले. पाऊस नसतानाही प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून वाहने काढावी लागत आहेत.
चार गावाचा पाणीपुरवठा खंडित
उरण तालुक्यातील उलवे, द्रोणागिरी आणि खारघर या भागात या पाइपलाइनवरून पाणी पुरवठा केला जातो. ती फुटल्याने या गावातील पाणीपुरवठा हा खंडित झाला आहे. तो सुरळीत होण्यासाठी सात ते आठ तास लागणार असल्याची शक्यता आहे. तर पाणीपुरवठा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे.