रायगड - उरण येथील सारडे विकास मंच हे गेली अनेक वर्षे कोमना देवी मंदिर परिसरात झाडे लावून त्याची जपवणूक करत आहे. मात्र या परिसरातील निर्जीव असलेल्या दगडांवर अनेक प्रकारची वन्यजीवांची चित्रे काढून त्यांच्यात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केला आहे. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
चित्रकार रवी साटम यांच्या कुंचल्यातून साकारली चित्रे
सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमना देवी परिसरातील डोंगरावर गेली अनेक वर्षे झाडे लावून ती जगविण्याचे काम केले जात आहे. यामुळे या परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे. यावर समाधान न मानता सारडे विकास मंचने निर्जीव दिसणाऱ्या दगडांना जिवंतपणा आणण्याचा निर्धार केला. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येथील दगडांवर वन्यजीवांची चित्रे साकारण्यास सुरुवात केली. गेली ३ दिवस भर उन्हात वाघ, हरण, फुलपाखरे व इतर वन्यजीवांचे चित्र साकारत जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये त्यांना यश आले असून यामुळे या परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे. या यशस्वी प्रयत्नाबद्दल येथील परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमासाठी मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे राजू मुबंईकर, शिक्षक नेते कौशिक ठाकूर, चित्रकार रवी साटम, रोहित पाटील, रोशन पाटील, संपेश पाटील, अनिल घरत, प्रसाद पाटील आदींनी प्रयत्न केले.
जंगल वाढीला अधिक चालना मिळेल
उजाड माळरानावर सध्या वृक्षारूण करून, वृक्ष जगवण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे. तर जंगलाचे संवर्धन होऊन निसर्ग अधिक खुलला पाहिजे, हा तरुणाईचा ध्यास आहे. त्यातूनच निर्जीव दगडांवर वन्यजीवांची चित्र साकारून या दगडांमध्ये जिवंतपणा आणणे ही संकल्पना कौतुकास्पद आहे. यामुळे जंगलांमधील पर्यटन वाढेल आणि जंगल वाढीला अधिक चालना मिळेल. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असणाऱ्या वन्यजीवांनाही संरक्षण मिळेल.