रायगड - पनवेलमध्ये काही महिन्यांपूर्वी निवडणुकांत एकमेकांवर आरोपांचे बाण सोडून एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राजकारणी नेते जर एकाच छताखाली आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण नुकतंच पनवेलमध्ये शेतकर्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी पनवेलमधील सर्व पक्षीय नेते एकवटले आहेत. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. नुकतीच या मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.

दिवंगत नेते दि. बा. पाटील यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करून दिशा निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक आंदोलन यशस्वी झालीत. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी सरकारला निर्णय घेण्यासही भाग पडले. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राजकीय पादुका बाजूला ठेवून पनवेलमधील सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर, शेकापचे आमदार विवेक पाटील, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील असे उरण-पनवेलमधील सर्व पक्षातील रथी-महारथी उद्या एका व्यासपीठावर येणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटपर्यंत लढणारे प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांची सोमवारी पुण्यतिथी आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता पनवेल, उरणमधील शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचा मेळावा पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. या मेळाव्यात शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे विचार ऐकून प्रश्न मार्गी लावण्याची दिशा ठरविण्यात येणार आहे. सुरुवातीला चर्चेने प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जातील. मात्र, न्याय न मिळाल्यास आंदोलनही उभारण्याची भूमिका ठाकूर यांनी स्पष्ट केली.
पनवेल, उरण परिरसरात विविध प्रकल्प साकारले आणि नव्यानेही प्रकल्प येत आहेत. त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्ताचे प्रलंबित आणि नव्याने निर्माण होणारे प्रश्न यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करीत होतो. त्यांच्या आशीर्वादाने ती घडी पुन्हा बसविण्याचे काम होणार असून सत्तेत असो वा नसो शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने ठामपणे कायम उभे राहू, असेही माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी म्हटले आहे. दि.बां. च्या नेतृत्वाखाली राज्याला केंद्राला अनेक निर्णय घ्यावे लागले आहेत. मी सिडकोचा अध्यक्ष असलो तरी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरावर कारवाई नको अशी ठाम भूमिका यावेळी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वात 2010 साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निर्णय घ्यायला लावला होता. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी कायम लढत राहणार असून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही जाऊही द्यायचे नसते आणि चर्चेची दारे बंद ठेवायची नाही, हे दि. बा. साहेबांचे दोन मूलमंत्र होते. त्यांच्या आशीर्वादाने प्रकल्पग्रस्तांसाठी लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, निलेश पाटील, भूषण पाटील, अविनाश पाटील, जे. डी. तांडेल, सुरेश पाटील, सुदाम पाटील, सुधाकर पाटील, नंदराज मुंगाजी यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.