रायगड - अलिबाग तालुक्यातील खानाव येथील 23 आदिवासी कुटुंब आता हायटेक पद्धतीने बांधलेल्या घरात वास्तव्य करणार आहे. जिल्हाधिकारी आणि ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरममार्फत आत्मनिर्भर वेलटवाडी गाव या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेले हो पहिलेच अत्याधुनिक गाव ठरणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले असून काम सुरू करण्यात आलेले आहे.
खानाव ग्रामपंचायत हद्दीत डोंगर कुशीत वसलेल्या वेलटवाडी आदिवासी वाडीवरील 23 कुटूंब गेली शंभर वर्षांपासून डोंगरावर राहत होती. 2018 साली झालेल्या अतिवृष्टीत डोंगराला भेग पडल्याने या कुंटुबांना डोंगराच्या पायथ्याखाली असलेल्या शाळेत हलविण्यात आले होते. या कुटूंबाचा पुनर्वसन प्रश्न हा प्रलंबित राहिल्याने पुन्हा ही कुटुंबे आपल्या मूळ ठिकाणी वास्तव्य करू लागली.
3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वेलटवाडी आदिवासी वाडीवरील अनेक कुटूंबाच्या घराची पडझड झाली. त्यानंतर पुन्हा या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. डोंगर पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या जागेवर तात्पुरती निवारा शेडची व्यवस्था त्यांना राहण्यासाठी करण्यात आली होती. मात्र वन विभागाकडून त्यांना नोटीसी आल्याने आता राहण्यासाठी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, खानावचे माजी सरपंच अनंत गोंधळी यांनी या निर्वंसित कुटुंबासाठी पुढाकार घेऊन खासगी 31 गुंठे जागा खरेदी करून दिली. ही जागा खरेदी करण्यासाठी आदिवासी कुटुंबांनी प्रत्येकी 65 हजार रुपये दिले असून त्यांच्या नावावर जागेची नोदंणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आणि ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरमच्या माध्यमातून आता या कुटुंबांना घरे बांधून देण्यात येणार आहेत. साडेपाचशे स्वेअर फूट असलेल्या या घरात सोलर सिस्टम, सीसीटीव्ही, बायो टॉयलेट, वायफाय, गार्डन, मुलांना खेळण्यासाठी सुविधा, समाजमंदिर, रस्ते, पथदिव्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच त्यांना राहत्या ठिकाणी स्वतःचा रोजगारही शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले असून काम सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे वेलटवाडीवरील आदिवासी रहिवाशांचा घराचा प्रश्न हा सामाजिक बांधीलकीतून सोडविण्यात आला आहे.