रायगड - स्वप्न पूर्ण करणारी आणि मायानगरी असलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. कोरनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम मुंबई येथे कामानिमित्त गेलेल्या चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबावरही झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. संचारबंदी असल्याने प्रवासी वाहतुक बंद आहे. त्यामुळे गावी परतण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने हे चाकरमानी चालत गावाकडे निघाले आहेत. अशाच एका 80 वर्षीय आजीने सलग तीन दिवस पायी चालत मुंबई ते म्हसळा हे दिडशे ते पावणे दोनशे किमीचे अंतर कापत आपले गाव गाठले आहे.
कोरोनाच्या भितीने मुंबईकर चाकरमानी ‘गड्या आपला गावच बरा’ असे म्हणत गावाकडे परतण्यासाठी धडपडत आहेत. केंद्र सरकारने 21 दिवसांचा संचारबंदी जाहीर केल्याने देशभरातील सरकारी व खासगी वाहतूक सेवा बंद आहेत. त्यामुळे मिळेल त्या साधनाने अथवा पायी चालत स्वतःचे गाव गाठण्यात येत आहे. मुंबईत राहणार्या केरीबाई धर्मा पाटील या 80 वर्षीय आजीने नवी मुंबईच्या नेरुळ येथून पायी चालत म्हसळा तालुक्यातील मेंदडी गाव गाठण्याचा निश्चय केला.
2 एप्रिल रोजी या आजीबाई म्हसळा दिघी नाक्यावर पोहोचल्या. तेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. यानंतर दिघी नाक्यावर कार्यरत असणारे पोलीस समर्थ सांगले यांनी माणुसकीचे दर्शन घडवत स्वखर्चाने या आजीला जीवनावश्यक वस्तू भेट देऊन, त्यांना त्यांच्या गावी म्हणजेच मेंदडी येथे पोलीस गाडीतून सोडले.
हेही वाचा - कोरोना : किल्ले रायगडावर 8 एप्रिल रोजी होणारा अभिवादन कार्यक्रम रद्द