रायगड - लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १६ उमेदवार असणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. युतीचे उमेदवार अनंत गीते व आघाडीचे सुनील तटकरे यांच्यात खरी लढत होत होणार. मात्र, वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष रिंगणात असल्याने लढत रंगतदार होणार आहे.
आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने विलास गजानन सावंत ( महाराष्ट्र क्रांती सेना), संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), गायकवाड अनिल बबन ( अपक्ष), अशोक दाजी जंगले (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष), सचिन भास्कर कोळी,( वंचित बहुजन आघाडी) या आठ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात रिंगणात अनंत गंगाराम गीते (शिवसेना), तटकरे सुनील दत्तात्रय (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी ), सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी ), मिलिंद भागुराम साळवी ( बहुजन समाज पार्टी ), मधुकर महादेव खामकर ( अपक्ष ), संदीप पांडुरंग पार्टे ( बहुजन महा पार्टी), तटकरे सुनील सखाराम (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), घाग संजय अर्जुन( अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके,( भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील, (अपक्ष), तटकरे सुनील पांडुरंग ( अपक्ष), योगेश दीपक कदम ( अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) हे सोळा उमेदवार राहिले आहेत.
उद्यापासून उमेदवारांचा खरा प्रचार सुरू होणार असून घरोघरी, तसेच गावागावात मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होणार आहे. त्याचबरोबर आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडूनही उमेदवारांवर व कार्यकर्त्यांवर लक्ष राहणार आहे.
रुग्णवाहिका देखील उपलब्ध
नुकतेच हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय केली आहे, असे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. त्यासह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका देखील नियुक्त करण्यात येतील. जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील याबाबतीत सूचना दिल्या असून वेळप्रसंगी वैद्यकीय सेवा दिली जाईल. १०८ रुग्णवाहिका देखील प्रत्येक विधानसभा मतदार संघात सहज उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.
रायगड लोकसभा मतदार संघात ७७३६ दिव्यांग असून १२२० अंध (क्षीण दृष्टी) आहेत. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
व्हील चेअर्सची सुविधा
एकंदर ६७३ व्हील चेअर्सची मागणी असून ३०० पेक्षा जास्त व्हील चेअर्स उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
४० हजार लिटर दारू जप्त
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध पथके बारकाईने लक्ष ठेवून असून ४० हजार लिटर दारू जप्त करण्यात आल्याची माहितीही डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.