पेण (रायगड) - पेण तालुक्यातील तांबडशेत गावात 75 वर्षीय आनंदीबाई मारुती पाटील यांची धारदार कोयत्याने गळा कापून हत्या करण्यात आली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. संशयित आरोपी दादर सागरी येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पेण तालुक्यातील तांबडशेत गावातील आनंदीबाई मारुती पाटील या 75 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली. त्या बुधवारी (ता. 6) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत गावाबाहेरील तलावाशेजारील आंब्याच्या बागेत जळाऊ लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. येथे अज्ञात व्यक्तीकडून धारदार कोयत्याने या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत महिलेला गहाण वस्तू सोडविण्यासाठी 2 वर्षांपूर्वी 25 हजार रुपये दिले होते. ते या महिलेने परत न दिल्याने ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. घटनास्थळी हत्येसाठी वापरलेला कोयता सापडला आहे.
दरम्यान, फिर्यादी रोहिदास मारुती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेतील संशयित आरोपी मंजुळा भगवान पाटील, भगवान धर्मा पाटील आणि रत्नाकर धर्मा पाटील (सर्व राहणार तांबडशेत, पेण) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भा.दं.वि.कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार करत आहेत.