रायगड - जिल्ह्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. 88 ग्रामपंचायतीच्या 311 प्रभागात 840 सदस्य पदांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. 840 सदस्य पदांसाठी 2475 जणांनी सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत 39 अर्ज अवैध ठरले असून 2436 अर्ज वैध ठरले आहेत. 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर रिंगणात किती उमेदवार राहतील हे कळणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी तर कुठे युती, महायुती अशा लढती होत आहेत.
जिल्ह्यात 15 जानेवारीला मतदान -
जिल्ह्यातील मार्च ते सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तर मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे. जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष हे कामाला लागले आहेत.
840 सदस्य पदांसाठी निवडणूक -
अलिबाग 4, पेण 7, पनवेल 24, उरण 6, कर्जत 9, रोहा 21, माणगाव 5, महाड 5, श्रीवर्धन 4 आणि म्हसळा 3 अशा 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. सर्वाधिक पनवेल आणि रोहा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. अलिबाग तालुक्यात 38 जागांसाठी 140 अर्ज आले असून 137 वैध तर 3 अवैध, पेण मध्ये 67 जागांसाठी 181 अर्ज आले असून 179 वैध तर 2 अवैध, पनवेलमध्ये 228 जागांसाठी 691 अर्ज आले आहेत तर 684 वैध तर 7 अवैध, उरणमध्ये 70 जागांसाठी 247 उमेदवारी अर्ज आले असून 236 वैध तर 11 अवैध, कर्जातमध्ये 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 292 वैध तर 5 अवैध ठरले आहेत.
छननीत 39 अर्ज अवैध -
रोहा तालुक्यात 191 जागांसाठी 607 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 598 वैध तर 9 अवैध, माणगावमध्ये 47 जागांसाठी 79 उमेदवारी अर्ज आले असून सर्व वैध ठरले आहेत. महाडमध्ये 47 जागांसाठी आलेले 93 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. श्रीवर्धनमध्ये 36 जागांसाठी 97 उमेदवारी अर्ज आले असून एकच अवैध ठरला आहे. म्हसळ्यात 27 जागांसाठी 43 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एकच अवैध ठरला आहे.
2436 उमेदवारी अर्ज वैध -
31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीत 39 अर्ज अवैध ठरले आहेत. 2436 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. चार जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील प्रत्येकावर कारवाई करणार - केदार