रायगड - विनापरवाना गावठी बनावटीची रिव्हॉल्वर व चार जिवंत काडतूस विकण्यास आलेल्या तिघांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (दि.11 ऑगस्ट) पोलीस कोठडी सुनावली आहे
मोमीन मोसीन, गौरव पाटील, विनेश पाटील, असे आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे करीत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक वृत्त असे, पोयनाड येथील आरोपी मोमीन मोसीन हा 7 ऑगस्टला साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या जवळ असलेले गावठी बनावटीचे अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर) विकण्यास अलिबाग येथे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अलिबाग पोलिसांनी सापळा रचला होता. अलिबाग-पोयनाड रस्त्यावर पिंपळभाट येथील मोटार सायकल शोरूम जवळ आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी मोमीन यांच्याकडे गावठी बनावटीची रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे, असा मुद्देमाल जप्त केला.
मोमीनकडे अधिक चौकशी केली असता गौरव पाटील, विनेश पाटील या दोघांची नावे त्याने सांगितली. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी पोयनाड येथील राहणारे आहेत. मोमीन याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिघांच्या विरोधात शस्त्र अधिनियम अंतर्गत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.