रायगड - अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली गावातील आंग्रे कालीन श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर २३९ वर्ष पुरातन मंदिर आहे. श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिराची रचना ही प्रति पंढरपूर सारखी करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच वरसोली गावाला प्रतिपंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते. आषाढी व कार्तिकी एकादशीला मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येईल.
वरसोली येथील श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर हे आंग्रे कालीन असून कान्होजी आंग्रे यांच्या सून नर्मदा आंग्रे यांनी या मंदिराची बांधणी केली होती. त्यानंतर २००४ पासून हे मंदिर विश्वस्त मंडळाच्या ताब्यात आले. त्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर १०० फूट रुंद व ४० फूट लांब आहे. मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीचा गाभा हा पूर्ण दगडी बांधकाम केलेला आहे.
श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिराची रचना ही पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासारखी केली आहे. मंदिराच्यासमोर छोटेसे गरुड मंदिर, तुळशीवृंदावन व दीपमाळ आहे. मंदिराला भव्य असा सभामंडप असून त्याच्या पुढील भागात विठ्ठल रुक्मिणीचा शयन कक्ष, पालखी कक्ष तसेच गरुड खांब आहे. तर मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची सुबक मूर्ती आहे. मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी व पालखी फिरवण्यासाठी मार्ग केलेला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात भजन, कीर्तन काकड आरती असा भव्य कार्यक्रम पार पडत असतो. आषाढी एकादशीनिमित्त अलिबाग तालुक्यातील नवगाव, रेवस, बोडणी, वरसोली तसेच शाळांच्या दिंड्या येत असतात. येणाऱ्या भाविकांना दर्शन चांगले मिळावे यासाठी सोय केलेली आहे. आषाढी एकादशीवेळी मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.