रायगड - उरणच्या जेएनपीटी विभागातील स्पिडी या वेअर हाऊसमध्ये एका कंटेनरमधून १९ किलो सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाने हस्तगत केली आहेत. या सोन्याच्या बिस्किटाची किंमत ६ कोटी २७ लाख आहे.
खजुराच्या कंटेनरमधून या सोन्याची तस्करी करण्यात आली होती. जेएनपीटीच्या माध्यमातून याआधीही अशाप्रकारची निर्यात केलेल्या कंटेनरमधून होत असलेली तस्करी उघड झाली आहे. यामुळे जेएनपीटी बंदर तस्करांच्या रडारावर असल्याचे समोर आले आहे.
उरणमधील जेएनपीटी विभागातील स्पिडी वेअर हाऊसमध्ये इराकी खजुरांचा कंटेनर बोटीमार्गे आणण्यात आला होता. या कंटेनरची स्कॅनिंगद्वारे तपासणी केली असता सोन्यासारखी वस्तू असल्याचे निदर्शनात आले. याबाबत सीमाशुल्क विभागाने कंटेनर खोलून तपासणी केली असता खजुराच्या बॉक्समध्ये सोने असल्याचे दिसले. ही सोन्याची बिस्किटे १९ किलोची असून त्याची बाजारात ६ कोटी २७ लाख एवढी किंमत आहे.
सीमाशुल्क विभागाने सोन्याची बिस्किटे जप्त केली असून याबाबत अधिक तपास करीत आहेत. जेएनपीटी बंदर हे तस्कराचा अड्डा झाला असून आतापर्यंत चंदन, सोने, अमली पदार्थ, बंदुका याची तस्करी झालेली आहे. कंटेनरमधून येणारा हा माल सीमा शुल्क विभागाकडून जप्त केला जातो. मात्र, अद्यापही या तस्करापर्यंत पोहचण्याचे धारिष्ट्य दाखविण्यात आलेले नसल्याचे तस्करी करणाऱ्यांचे फावलेले आहे.