रायगड - राज्यात तिसऱ्या टप्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातही 11 ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात साधारण दीडशे ज्येष्ठ नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. मात्र, कोविन अॅपच्या तांत्रिक अडचणींचा फटका हा ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याने लस घेण्यासाठी अॅप चालू होण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत.
जिल्ह्यात 11 ठिकाणी लसीकरण सुरू
रायगड जिल्ह्यात अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयासह अकरा ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे. फ्रंट वर्कर याच्यासह को मोर्बेट असलेल्या जेष्ठ नागरिकांनाही कोविड लस देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात अलिबाग, पेण, माणगाव, श्रीवर्धन, उरण, पनवेल, कर्जत, खालापूर याठिकाणी लसीकरण केंद्रात जेष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यत दीडशे जेष्ठ नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तर पुन्हा 28 दिवसांनी त्यांना दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
लसीकरण आधी केली जाते तपासणी
ज्येष्ठ नागरिकांना कोविन ऍप मध्ये आपली सर्व माहिती भरून द्यायची आहे. त्यानंतर लसीकरण केंद्रावर आल्यानंतर जेष्ठ नागरिकांची तपासणी केली जाते. बीपी, शुगर, इतर आजाराची माहिती डॉक्टर व परिचारिका यांच्यामार्फत घेतली जाते. त्यानंतर त्यांना लस दिली जाते. मात्र एखाद्या जेष्ठ नागरिकांना काही त्रास असेल तर त्याला लस दिली जात नाही.
अॅपच्या तांत्रिक अडचणींचा फटका ज्येष्ठ नागरिकांना
शासनाने लसीकरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कोविन ऍप ची निर्मिती केली आहे. या ऍपमध्ये लस घेणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती भरली जाते. त्यानंतर तो व्यक्ती लसीकरण केंद्रावर आल्यावर ऍप मध्ये त्याची माहिती बघितली जाते. त्यानंतर ती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला लस दिली जात असते. मात्र कोविन ऍप मध्ये नवीन बाबी आल्या असल्या कारणाने सध्या ह्या ऍपला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांची ऍपमध्ये नोंद झाल्यानंतर लस दिली जात आहे. मात्र जोपर्यत ऍप सुरू होत नाही तोपर्यत जेष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी मागणी जेष्ठ नागरिकांकडून होत आहे.