रायगड - वारंवार वीज खंडित होत असल्याच्या निषेधार्थ अलिबाग तालुक्यातील 14 सरपंचांनी महावितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथील अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारला. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले आहे. 15 दिवसांत कारभार बदलला नाही तर, आरसीएफ कंपनीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला आहे.
विजेचा लंपडाव : अलिबागमधील 14 सरपंचांचा महावितरण अधिकाऱ्याला घेराव रेवस फिडर अंतर्गत शेकडो गावे अलिबाग ग्रामीण महावितरणच्या अखत्यारित येतात. आठ महिन्यांपासून रेवस फिडमधील गावात वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. वीजग्राहकांना होत असलेल्या या त्रासाबाबत महावितरण अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आली होती. मात्र, अद्यापही रेवस फिडरमधील वीज ग्राहकांचा त्रास कमी झालेला नाही. अखेर आज महावितरण विभागाच्या पंतनगर येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांना सरपंच, ग्रामस्थांनी जाऊन घेराव घातला. यावेळी सरपंच, ग्रामस्थांनी होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. यावेळी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातीलच वीज गेल्याने उपस्थितांनी महावितरणच्या कारभारासमोर हातच जोडले. कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन 15 दिवसांत रेवस फिडरवरील अडचणी सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला आहे. भिसे यांनीही लवकरच ही अडचण सोडविण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.
हेही वाचा - कचऱ्यात टाकलेल्या नवजात बालकाला डॉक्टर अन् पोलिसांनी दिले जीवदान