पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात खुनाचे सत्र सुरूच असून दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची प्राथमिक माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. ऋषिकेश बालाजी गायकवाड असे खून झालेल्या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी फिलीप नावाच्या तरुणाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात चार जणांच्या टोळक्याने ऋषिकेशचा दगडाने ठेचून खून केला आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबरा केला आहे. दरम्यान, एका संशयित आरोपीला पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले असून संबंधित आरोपी हा मुख्य असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अज्ञात आरोपी आणि मृत ऋषिकेश हे सर्व दारु प्यायला बसले होते. तेव्हाच दगडाने ठेचून ऋषिकेशचा खून करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.