पुणे - स्वतःच्या लग्नाची पत्रिका घेऊन जात असताना एका तरुणीचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील अहमदनगर - कल्याण महामार्गावर घडली. जया हांडे असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. महिनाभरातच तिचे लग्न होणार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जया नाथा हांडे (वय २५) ही पारनेर तालुक्यातील हांडेवाडा गावातील रहिवासी होती. ती तिच्या आईसह राहत असे. वाणिज्य विभागात तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या जयाचे लग्न नुकतेच ठरले होते. नुकतीच परीक्षा संपली होती. त्यामुळे स्वतःच्या लग्नाची पत्रिका घेऊन ती नातेवाईकांना देण्यासाठी निघाली होती.
नगर कल्याण महामार्गावर बेल्हे येथे सकाळच्या सुमारास तिच्या दुचाकीला (क्र. एम. एच. १६ बीएस ८९९६) समोरुन येणाऱ्या ट्रकने (क्र. एम. एच. १६ एई ३०५०) जोराची धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. लहानपणापासून आईसोबत कष्ट करून जयाने आपले शिक्षण पूर्ण केले. आता कुठे तिच्या संसाराला सुरुवात होणार होती. अशातच तिच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे तिचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.