पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल एक हजार 600 महिला कंत्राटी तत्वावर साफसफाईचे काम करतात. त्यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. मात्र मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने, बुधवारी या महिला कर्मचाऱ्यांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर थाळी नाद आंदोलन केले.
या महिलांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करत आहोत. सण उत्सवांच्या काळात आमच्यावर थाळी वाजवण्याची वेळ येणे, म्हणजे हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून, या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी आज निवेदन देण्यात आल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलकांच्या 'या' आहेत प्रमुख मागण्या
- कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
- दिवाळीचा बोनस देण्यात यावे
- कोरोना काळात सेवा दिल्याबद्दल 5 हजार रुपये अनुदान द्यावे
- कामगार महिलांना ई.एस.आय. सुविधा मिळावी
- साफसफाई कामगारांना घरकुल योजनेत प्राधान्य द्यावे
- मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे