पुणे - दुसऱ्या नवऱ्याने तिसऱ्याच बाईशी लग्न केल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी नवऱ्याकडे केलेली १५ लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी पूर्ण न झाल्याने एका महिलेने स्वतःच्याच चार वर्षीय मुलाचे अपहरण केले. यानंतर त्या महिलेसह तिघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन चांगदेव जगताप (वय ४) असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई संगीता चांगदेव जगताप (वय ३८), संगीता गणेश बारड (वय २९) आणि अभिजित अशोक कड (वय ३३) यांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संगीता जगताप हिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. पहिल्या पतीसोबत ती राहत असतानाच तिचे चांगदेव जगताप याच्याशी सूत जुळले होते. पहिला पतीचे निधन झाल्यानंतर संगीताने चांगदेव जगताप याच्याशी लग्न केले. त्याच्यापासून तिला आर्यन हा चार वर्षीय मुलगा झाला. मागील काही महिन्यांपासून दोघा नवराबायकोत वाद होते. चांगदेव जगताप याचा शिर्डी येथे सिड फार्मचा व्यवसाय असून तो तिथेच आईवडिलांसोबत राहतो. महिन्यातून कधीतरी येऊन तो पुण्यात संगीता हिच्यासोबत राहत असे.
काही दिवसांपूर्वी चांगदेवने दुसरे लग्न केले असून तो पत्नीसोबत शिर्डी येथे राहत असल्याची माहिती संगीता हिला मिळाली. नवऱ्याला जाब विचारण्यासाठी ती शिर्डी येथे गेली. यावेळी त्यांच्यात आणखी भांडण झाले. यावर तोडगा काढण्यासाठी संगीताने पतीला १५ लाख आणि एक फ्लॅट मागितला. मात्र, चांगदेवने यास नकार दिला. त्यामुळे संगीताने मुलगा आर्यनचा ताबा पतिकडे देण्यास नकार दिला. त्यात काही दिवसांपासून तिला चांगदेव याच्याकडून आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे तिने स्वतःच्याच मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला.
.
संगीताने मैत्रीण संगीता बारड आणि तिचा मित्र अभिजित कड यांची मदत घेत २८ एप्रिल रोजी दुपारी शेवाळेवाडी येथील शुभ ग्लोरिया सोसायटीच्या पार्कींगमधून आर्यनचे अपहरण केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांच्या तपासणीत संगीता बारड आणि अभिजित कड यांनी आर्यनचे अपहरण केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून विचारपूस केली असता त्यांनी संगीता जगताप हिच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी आई संगीता जगताप हिला अटक केली. तिने १५ लाख आणि फ्लॅट मिळवण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.