पुणे - नवऱ्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून स्वतःच्या दोन मुलांना दुधातून विष पाजले. त्यानंतर स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न पुण्यातील नऱ्हे परिसरातील महिलेने केल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेसह दोन लहान चिमुरड्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील एका शेतात हे कुटुंबीय राहतात. सोमवारी सकाळी या कुटुंबातील नवरा-बायकोत किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर नवरा कामावर निघून गेला. बायकोने या रागातून घरातील कीटकनाशक फवारणीचे औषध दुधात मिसळले आणि हे दूध मुलगी प्रांजल आणि मुलगा आदित्य यांना पिण्यास दिले. तीने स्वतः हे दूध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नवऱ्याला हा सर्व प्रकार माहित झाल्यानंतर त्याने तातडीने या तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी महिलेविरोधात स्वतःच्या आणि मुलांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पाटील करत आहेत.