पुणे - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने बहिणीच्या मुलाचा पाण्यात बुडवून खून केला. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.
चाकेन अवधेश वर्मा (वय 3 वर्षे), असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अवधेश धनीराम वर्मा (वय 27 वर्षे, रा. युनी वास्तू इंडिया कंपनी, लेबर कॅम्प, मार्केट यार्ड गेट जवळ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन आरोपी महिला निर्मला कैलास वर्मा (वय 22 वर्षे) हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अवधेश वर्मा यांची पत्नी व आरोपी महिला सख्या बहीणी आहेत. हे सर्व मार्केटयार्ड परिसरातील एका बांधकाम साईटवर काम करतात. बांधकाम साईटजवळच लेबर कॅम्पमध्ये यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोपी निर्मला हिला आपल्या बहिणीचे आणि नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
निर्मला वर्मा हीने 1 मे रोजी घराजवळ खेळणाऱ्या चाकेनला उचलले आणि बांधकाम साईटजवळ असणाऱ्या एका पाण्याच्या खड्ड्यात फेकून दिले. यामध्ये पाण्यात बुडाल्याने चाकेनचा मृत्यू झाला. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना एका ठिकाणी निर्मला ही चाकेन याला घेऊन जाताना दिसली. पण, परत येताना एकटीच होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी निर्मला हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने या कृत्याची कबुली दिली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक केली आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद; घरातील दागिने गहाण ठेवून तरुणाने उभारले कोविड रुग्णालय