बारामती - बारामती येथील एका कोरोनाबाधित महिला रुग्णावर उपचार सुरू असतानाच, तिला म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान या महिलेवर म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव बारामती परिसरात दिसून येत आहे. महिन्याभरात बारामतीमध्ये म्युकरमायकोसिसच्या 19 शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
कोरोनोमुळे महिलेची ऑक्सिजन पातळी 80 च्या खाली गेली होती. त्यातच तिला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने, बेशुद्ध अवस्थेतच रुग्णावर कुटुंबीयांच्या संमतीने म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतरच्या उपचारास प्रतिसाद न दिल्याने या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू हा म्युकरमायकोसिसने नव्हे तर कोरोनाने झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान बारामतीमध्ये एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना, दुसरीकडे मात्र आता म्युकरमायकोसिस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णांची तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - प्रियंका गांधींची फेसबुक पोस्ट.. जहाज वादळात सोडून पळून जाणाऱ्या कॅप्टनची तुलना पंतप्रधानांशी