बारामती (पुणे) - एखादे काम होणार असेल तर ते तातडीने पूर्णत्वाला नेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हातखंडा आहे. याची प्रचिती रविवारी (दि. २०) फलटण (जि.सातारा) येथील ११ निवृत्त शिक्षकांना आली. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू होता. यावेळी फलटण तालुक्यातील निवृत्त शिक्षकांनी जमीन फसवणुकीबाबतची तक्रार पवार यांच्या कानी घातली. पवार यांच्या सूचनेनुसार बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रविवारी रात्रीच या शिक्षकांची हक्काची जमिन परत मिळवून दिली.
हेही वाचा - पुणे : कोरेगावमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर सर्व मिळालेली आयुष्यभराची रक्कम खर्च करून बारामती शहरातील खंडोबा नगर येथे ग्रुपमध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती. चांगला भाव येत असल्याने त्यातील ४० गुंठे जागा शहरातील नामांकित 'तीन एजंट' च्या माध्यमातून विकण्यात आली. त्या तिघांनी कमिशन तर कमावले व त्याचबरोबर फलटण येथील शिक्षकांचा विश्वास संपादित केला. त्यामुळे, फलटण शिक्षक ग्रुप त्या तिघांवर खुश होता. राहिलेली वीस गुंठे जमीन विकण्याची जबाबदारी सुद्धा त्या तीन एजंटवर टाकण्यात आली. तिघांनी २० गुंठे विकली व त्यातील फक्त १४ लाख रुपये दिले व राहिलेले १ कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ आज कायम खुश खरेदी (दस्त नोंदणी) करून द्या, असे विश्वासाने सांगितले. पहिला व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुपने कायम खुश खरेदी करून दिले, परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा, बारामतीमध्ये आमचे कोणी वाकडे करू शकणार नाही, अशी भूमिका घेतली.
फलटण शिक्षक ग्रुपने विनंती केली, हात जोडले, कमिशन वाढून देण्याची तयारी दर्शवली, मध्यस्थ घातले, तरी ते तिघे रक्कम देईनात. हताश झालेले सर्व शिक्षक अगोदरच रक्तदाब, मधुमेह व विविध व्याधींनी त्रस्त होते. या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसल्याने यातील काही जणांना बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अजित पवारांच्या सूचना आणि अवघ्या काही तासात न्याय
सोमवारी दस्त नोंदणी रितसर होणार होती. त्यामुळे, रविवारी (दि. २०) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजित पवार यांनी त्वरित येथे उपस्थित असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा, अशी सूचना केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, फौजदर बाळासो जाधव आदींनी त्वरित तिघा एजंटना पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली. परंतु, प्रतिसाद देत नसल्याने पोलिसी खाक्या दाखवताच फसवणूक केल्याची कबुली दिली. या तिघांना वाचवण्यासाठी अनेकांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, परंतु खाकी वर्दीने चोख काम केले. अखेर दस्त पलटून देण्याचे लिखित स्वरुपात मान्य केले व पुन्हा फसवणूक करणार नसल्याचे सुद्धा लिहून दिले. अजित पवारांच्या दरबारात रविवारी सकाळी तक्रार व पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री न्याय मिळाल्याने फलटण येथील शिक्षक ग्रुपने समाधान व्यक्त केले.
हेही वाचा - पुण्यातील एमआयटी विद्यापीठ विरोधात अभाविपचे 'विमान उडाव' आंदोलन