पुणे - देहूरोडच्या मामुर्डी येथे विवाहबाह्य संबंधातून पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर, तीन प्रियकरांची कसून चौकशी देहूरोड पोलीस करत आहेत. मयूर गोविंद गायकवाड (वय 28, रा. मामुर्डी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मयूर, संशयित आरोपी पत्नी, आई आणि भावासह राहत होते. मयूर आणि पत्नीचे पटत नव्हते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असे. दरम्यान, सोमवारी मयूरचा भाऊ आणि आई हे दोघे रात्रपाळी नोकरीवर गेले होते. तेव्हा, मध्यरात्रीच्या सुमारास संशयित पत्नी आणि तिच्या तीनपैकी एका प्रियकराने मिळून मयूरचा गळा धारदार शस्त्राने चिरून खून केला असल्याचा संशय देहूरोड पोलिसांना आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून संशयित पत्नीला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, तिच्या तीनही प्रियकरांची देहूरोड पोलीस कसून चौकशी करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसात हा दुसरा खून देहूरोड परिसरात झाला असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - घरफोडी आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; 22 मोबाईल हस्तगत