पुणे - कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडत असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतःमध्ये बदल करत जगायला सुरुवात केली आहे. वेळ घालवण्यापेक्षा शेतातील कामात व्यस्त झाल्याने कोरोनाची भीती निघून गेली आणि शेतीच्या कामात अधिकचा वेळ मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब शेतीच्या कामात जुंपले आहे. यासोबतच आरोग्याचीही चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जात असल्याने, कोरोना महामारीचे हे संकट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जगण्याची नवी दिशा देत आहे.
चावडीवरील गप्पा झाल्या ठप्प...
गावचावडी वरील गप्पा-गोष्टी, सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, जत्रा-यात्रा, लग्न समारंभ अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेळ वाया जात होता. मात्र कोरोनामुळे गर्दी न करणे, मास्क वापरणे असे विविध निर्बंध आले. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी इतरत्र फिरण्यापेक्षा शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. आता शेतकरी संपूर्ण कुटुंबासमवेत शेतीच्या कामात पूर्ण वेळ देत असून शेतीकामाला मजुरांची तितकी आवश्यकता भासत नाही. कोरोनामुळे नागरिकांवर अनेक बंधने आली. मात्र हीच बंधने आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून त्यांचा चांगला फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहे.
शेतीकामात मुलांचा लागतोय हातभार...
कोरोनामुळे शाळकरी मुलांच्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी आता शिक्षणाचे धडे ऑनलाइन पद्धतीने घेत आहे. ग्रामीण भागातील शाळकरी मुले आपल्या शिक्षणाचे धडे घेत असतानाच शेती कामातही मदत करत आहेत. त्यामुळे शिक्षणाचे धडे गिरवत असताना शेतीच्या मातीत काम करून आता हे विद्यार्थी वेगळा आदर्श समाजापुढे ठेवत आहेत.
तरीही शेतकरी खंबीर...
कोरोना महामारीच्या संकट काळात ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले. यामध्ये चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर परतीच्या पावसाचे थैमान या संकटावर मात करत शेतकरी खंबीरपणे उभा आहे. कोरोना काळात घालून दिलेले नियम आत्मसात करून शेतकरी नव्याने उभा राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.