पुणे - पिंपरी-चिंचवडसह पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे पुण्यातील खासगी आणि महानगर पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्ण बरे होण्यासाठी डॉक्टर्सबरोबर परिचरिकांचे कामदेखील महत्त्वाचे आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात परिचारिका असलेल्या छाया संजय रसाळ या १४ दिवसानंतर आज पिंपरी-चिंचवडमधील घरी पोहोचल्या. तेव्हा, त्यांचं औक्षण करत फुले उधळून सोसायटीमधील नागरिकांनी त्यांचे स्वागत केलं.
छाया संजय रसाळ या काही वर्षांपासून ससून रुग्णालयात परीचारीका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना थायरॉईड आणि ब्लडप्रेशरचा आजार असूनही आपलं कर्तव्य त्या चोख बजावत आहेत. खरतर ज्यांना इतर आजार आहेत त्या व्यक्तीवर कोरोनाचा जास्त प्रभाव आहे. हे माहीत असतानादेखील परिचारिका छाया रसाळ कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून त्या कुटुंबापासून दूर होत्या. आज मोशी येथील घरी परतल्या असून, त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
छाया यांना सात दिवस ड्युटी आणि सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहावे लागते. त्यानंतर त्यांना एक दिवस घरी पाठवले जाते. कुटुंबासमवेत वेळ घातल्याने त्यांना पुन्हा काम करण्यास ऊर्जा मिळते. दरम्यान, नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केलं आहे. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावाव, सकारात्मक विचार करावा असेही त्या म्हणाल्या.