पुणे: मागच्या महिन्यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात तसेच जिल्ह्यातील पाणीपुरवठा बाबत बैठक घेतली होती. यामध्ये शहरात सद्यस्थितीत पाणीकपात होणार नाही, असा निर्णय जाहीर केला होता. तसेच महापालिकेला शहरातील पाणीपुरवठा बाबत अहवाल आठ दिवसांमध्ये मागविला होता. पुणे शहरातील पाण्याची परिस्थिती आणि हवामान विभागाने वर्ताविलेल्या अंदाजानुसार महापालिकेच्या वतीने पाण्याची सद्यस्थिती अभ्यासली गेली. त्यानुसार येत्या 18 मे पासून दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या कारणाने पाणीकपातीचा निर्णय: हवामान विभागाच्या वतीने यंदाच्या वर्षी पाऊस हा उशिरा आणि कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढील काळातील नियाेजन करण्यासाठी महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
०.२५ टीएमसी पाणी वाचविणार: खडकवासला धरणसाखळीतील चार धरणात सध्यस्थितीत एकूण ९.७० टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी हा ९.२० टीएमसी इतका हाेता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरी हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा दाखल हाेण्याचा तसेच पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार, केंद्र सरकारकडून आवश्यक त्या उपाययाेजना करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या गेल्या. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या पाणी कपातीमुळे साधारणपणे ०.२५ टीएमसी पाणी हे तीन महिन्यात वाचण्यास मदत हाेईल. तसेच पुढील निर्णय हाेईपर्यंत पाणी कपात सुरू राहणार असल्याचे यावेळी अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे. यामुळे आता पुणेकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.