पुणे - गेल्या सहा दिवसांपासुन सह्याद्रीच्या दर्या-खोर्यात पावसाचा जोर कायम आहे. तर, चासकमान, भामा-आसखेड, डिंबा, कळमोडी, वडजगाव, माणिकडोह या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असुन भीमा, भामा, इंद्रायणी, मिना, घोड या नद्या दुथडी भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी पुलांवरुन पुराचे पाणी जात असल्याने जाण्या-येण्याचे रस्ते बंद झाले आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात मागील उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. जलाशय कोरडे ठाण पडले होते. मात्र, सध्या पाऊसाच्या जोरदार बँटिंगमुळे जलाशय भरले असुन, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळी संकटाच्या भितीतुन दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील भात-शेती, बटाटा, सोयाबीन या पिकांना पोषक पाऊस होत असल्याने शेतकरी आनंदी आहे
उत्तर पुणे जिल्ह्यातील चासकमान, कळमोडी हि दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर, भीमा नदी पात्रात १३ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भामा-आसखेड, डिंबा,माणिकडोह, वडजगाव या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाऊसाचा जोर असाच कायम राहिला तर दोन दिवसांत सह्याद्रीच्या कुशीत सर्व धरणे ओव्हरफ्लो होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जलाशय पाणीसाठा पुढीलप्रमाणे
कळमोडी धरण -१०० टक्के, चासकमान धरण - ९९.२९ टक्के, भामा-आसखेड धरण -७५.५३ टक्के, माणिकडोह धरण - ३२.५६ टक्के, येडगाव धरण - ४२.२२ टक्के, वडजगाव धरण - ४७.७८ टक्के, डिंबा धरण - ६४.२३ टक्के, चिल्हेवाडी धरण - ६८.०९ टक्के