पुणे (बारामती) - पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असताना बारामती तालुक्यात मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे. मतदारांची नावे, आडनाव व पत्ते चुकले आहेत. महसूल विभागाकडून मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप पदवीधर मतदारांनी केला आहे. माळेगाव येथील नावे बारामतीत, बारामतीची नावे सुप्यात, सुप्याची हवेलीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मात्र मतदान करून घेण्यासाठी मोठे कष्ट उचलावे लागणार आहेत. पदवीधरसाठी बारामती तालुक्यात ८ हजार ११७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बारामती तालुक्यात बहुतांश मतदारांची नोंदणी झाली. मात्र, यादीत नावेच नाहीत. ती का आली नाहीत याबाबत महसूल अथवा प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यातून ६२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना पसंती क्रमांक दिल्याने आणि मतदान कसे करायचे याबाबत फारशी माहिती नसल्याने मतदान बाद होण्याची शक्यता जास्त आहे. बारामती तालुक्यात सहा मतदार केंद्रातील संपूर्ण तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
ताण वाढणार -
मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याने बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर मतदान करून घेण्यासाठी ताण वाढणार आहे. मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता असून याचा फटका कोणाला बसणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
बारामती तालुक्यातील मतदान केंद्रे -
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालय बारामती, माळेगाव येथील एसएसएम हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपे, जिल्हा परिषद शाळा उंडवडी कप, स्वातंत्र्य विद्या मंदीर वडगाव, जिल्हा परिषद शाळा लोणी भापकर याठिकाणी मतदान पार पडणार आहे.