बारामती (पुणे) - तालुक्यातील पश्चिम भागातील २७ गावे वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जात होती. मात्र, या गावात लोकसहभाग व विविध समाजसेवी संघटनाद्वारे केलेले श्रमदान व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ही गावे पाणीदार झाली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी दिली.
एका बाजूला बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास तर एका बाजूला पश्चिम भागातील २७ गावे व ३०२ वाड्या वस्त्यांमध्ये दुष्काळ असे विरोधाभासाचे चित्र होते. या दुष्काळी पट्ट्यात ओसाड माळरान, विहिरी, बोरवेल, तलाव कोरडे पडले आणि २७ पेक्षा अधिक गावांना टँकरची पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र यंदाच्या झालेल्या पावसाने या दुष्काळी गावांचे संपूर्ण चित्र पालटले आहे. गावकऱ्यांचा लोकसहभाग, श्रमदान आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांना साथ मिळाली ती विविध समाजसेवी संघटना आणि निसर्गाची. दुष्काळ भागात अतिवृष्टी झाल्यामुळे दुष्काळग्रस्त गावे पाणीदार झाले असून गावातून दुष्काळ हद्दपार झाला आहे.
.... म्हणून वाढली भूजल पातळी
या गावातील गावकर्यांना एन्व्हारयन्मेंटल फोरम, बारामती अॅग्रो, भारत फोर्स, पियाजीओ व्हेईकल्स आणि पाणी फाउंडेशनची साथ मिळाली आहे. यांच्या मदतीने ओढा खोलीकरण, रुंदीकरण, तलाव खोलीकरण, बांध बधिस्ती, पाझर तलाव गाळ काढणे, सलग समतल चर काढले त्यामुळे पाणी जमिनीत मुरले गेले आणि भूजल पातळी वाढली आहे. सलग दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहे.
उन्हाळ्यातही पीक घेणे झाले शक्य
परिणामी १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षा भयंकर असणाऱ्या दुष्काळावर मात झाली आहे. नाझरे धरण बांधण्यापूर्वी कऱ्हा नदी लगत असणाऱ्या गावांना ८ ते ९ महिने जेमतेम पाणी मिळायचे. यापूर्वी शेतकर्यांना उन्हाळी हंगामात पिके घेता येत नव्हती. मात्र १०० मिलीमीटर झालेल्या पावसामुळे शेतकर्यांना उन्हाळी हंगामातील पिके घेणे शक्य होणार असल्याचे कृषी प्रशासनाने सांगितले.
दुष्काळी गावात पाणी योजना कार्यान्वित
गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सन २००४ ते २०१५पर्यंत जवळपास ७२ गावात स्वजलधारा, भारत निर्माण कार्यक्रम, वर्धित वेग कार्यक्रम, बिगर आदिवासी अशा विविध योजनांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती मार्फत अंदाजे २४ कोटी ८६ लाख ४३ हजार ६०३ रुपये खर्च करून पाणी योजना करण्यात आल्या होत्या. मात्र पाणी योजनांचे उद्भव कोरडे पडल्यामुळे बंद झाल्या होत्या. यावर्षी पावसामुळे योजनांचे उद्भव जलमय झाले असल्याने योजना कार्यान्वित झाल्या आहेत.
ही गावे झाली पाणीदार
सुपा, नारोळी, कोऱ्होळी, देऊळगाव रसाळ, उंडवडी सुपे, शिर्सुफळ, साबळेवाडी, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी-सुपेसावंतवाडी, अंजनगाव, जळगावसुपे, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपूर, उंडवडी. क. प., दंतवाडी, पानसरेवाडी, जराडवाडी, भिलारवाडी, पळशी, मोराळवाडी, मोढवे, काऱ्हाटी, मुर्टी, सायंबाचीवाडी, उंबरवाडी, चौधरवाडी, कऱ्हावागज या गावांचा समावेश आहे.