पुणे : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, जे काही अलीकडच्या काळात तोडफोडीचे राजकारण या राज्यात झाले ते राज्यातील जनतेला अजिबात पटलेले नाही. जनता निवडणुकीची वाट बघत आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास आता उडत चालला आहे, अशी परिस्थिती देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे.
आम्ही दोघे भाऊ भाऊ जमेल तर वाटून खाऊ : औरंगजेबच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, औरंगजेबचे नाव घेऊन ज्याला मते मिळतात तोच औरंगजेब म्हणतो. तर औरंगजेबला विरोध करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मुखात एक, पोटात एक घेऊन आहेत. आरएसएसच्या लोकांनी स्वतःच्या मुलांचे नाव कधी शिवाजी महाराज ठेवले नाही. कधी शिवाजी महाराज यांचा फोटो नागपूर कार्यालयात बघायला मिळाला नाही, हे मतांचे राजकारण आहे. काहीना शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय मत मिळत नाहीत तर, काहीना औरंगजेबचे उदोउदो केल्याशिवाय जमत नाही. त्यामुळे यांची मिलीभगत आहे. आम्ही दोघे भाऊ भाऊ जमेल तर वाटून खाऊ आणि राज्यात हिंदू मुस्लिम मतभेत करू, असे लोक सध्या राज्यात दिसत आहेत, असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
सतेची लाचारी : ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ हे भाजपासोबत गेल्याचे पाहायला मिळत आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, सगळे भाजपासोबत जातील पण भुजबळपण जातील हे कोणालाच वाटले नव्हते. भुजबळ यांच्या तोंडी मोदींचे नाव येईल स्वप्नातही वाटले नव्हते. पण, हे सगळे जे काही आहे ते सतेचे लाचारी आहेत. भुजबळ आता ओबीसींचे राहिले नाहीत. भविष्यात त्यांना राजकीय संकटांचा सामना करावा लागणार आहे, असे देखील यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
टोळीत घुसून मलिदा खाण्याची प्रवृत्ती : आज जे लोक पक्षातून बाहेर गेले आहेत, त्याचा त्या पक्षावर परिणाम होईल असे अजिबात वाटत नाही. शिंदे सेनेचे फक्त दोन खासदार निवडून येतील, राष्ट्रवादीचेसुद्धा तेच आहे. भाजपाला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात मोठा आनंद भेटतोय की काय असे वाटत आहे. काल परवापर्यंत ज्यांना चोर, डाकू म्हणत होते, त्यांच्या टोळीत घुसून मलिदा खाण्याची प्रवृत्ती पुढे आली काय असे जनतेला वाटत आहे, अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली आहे.
तुमचा अंदाज खोटा ठरणार : दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील हजर होते. यावेळी त्यांना शिंदे-फडणवीस यांच्यासोबत अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने ताकद वाढणार आहे का? असे विचारले असता यावर ते म्हणाले की, पहिली जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजित पवार आल्याने ताकद वाढली असे म्हणत असतील तर ती ताकद कुणाची भाजप की, अजित पवारांची वाढणार? भाजपाला नाकारले म्हणून अजित पवारांचा वापर करत असेल तर तुमचा अंदाज खोटा ठरणार आहे.
लोक तिकडे जाऊन गुलाम होत आहेत : आज येताना बोर्ड बघत होतो, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल हा देशाचे गृहमंत्रीपेक्षा मोठा आहे. परंतु, बोर्डावर त्यांचे फोटो कार्यकर्त्यांसारखे खाली लावलेले आहेत. यातूनच वैचारिक ताकदीचा अधोपतन झाले आहे. हे लोक आता तिकडे जाऊन गुलाम होत आहेत. गुलामांच्या लाईनमध्ये जाऊन सगळे बसत आहेत हा माझा आरोप आहे. दहा वर्षे सत्तेत राहून स्वबळावर निवडणूक लढवून सत्तेत येण्याची त्यांची ताकद नाही. जनतेची कामे केली नाही म्हणून पुरोगामी लोकांची गरज वाटत आहे, असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा -
- Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेला अखेर मिळाला विरोधी पक्षनेता, विजय वडेट्टीवार यांच्या निवडीवर सभागृहात कोण काय म्हणाले?
- Vijay Wadettiwar As Opposition Leader: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
- Maharashtra Politics: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू; महायुतीसह महाविकास आघाडीने बोलावली आज बैठक