पुणे - शहरातील मध्यवर्ती भाग म्हणजे शिवाजीनगर. २०१४ साली या मतदारसंघातून भाजपचे विजय काळे हे मोदी लाटेत विजयी झाले होते. गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अद्यापही मार्गी लागले नाहीत. त्यामुळे आमदार विजय काळेंवर येथील जनता नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने सर्वच पक्ष मराठा उमेदावर देतात. या मतदारसंघात सर्वच पक्षाकंडून इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
विद्यमान आमदार विजय काळे यांच्याबद्दल पक्षांतर्गत मोठी नाराजी आहे. उमेदवार बदलावा अशी मागणी पक्षातूनच करण्यात येत आहे. पुण्यातील ८ मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक इच्छुक याच मतदारसंघात आहेत. तर आघाडीचा विचार करता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहे. आघाडीकडून या मतदारसंघात दत्ता बहिरट आणि मनिष आनंद हे इच्छुक आघाडीवर आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात मराठा समाजाच प्राबल्य आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष या मतदारसंघातून मराठा समाजाचा उमेदवार देण्यास प्राधान्य देतात.
भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार विजय काळे तसेच माजी खासदार अनिल शिरोळे याचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे हे इच्छूक आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार विनायक निम्हण या मतदारसंघातून पुन्हा इच्छुक आहेत. काँग्रेसकडून दत्ता बहिरट आणि मनिष आनंद हे इच्छुक आहेत.
मतदारसंघातील प्रश्न
खडकी कॅन्टोन्मेंटं बोर्डसाठी वार्षिक 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विकास शुन्य झाला आहे. खडकी हॉस्पिटल, दळवी हॉस्पिटल आणि शेवाळे हॉस्पिटलला प्रत्येकी एक अॅम्ब्युलन्स दिली. मात्र, सरकारी हॉस्पिटल हवी तशी अद्यावत झाली नाहीत. मतदारसंघातील कचरा आणि वाहतूक कोंडी प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर अतिक्रमण वाढली आहेत. ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये एसआरए सारख्या योजना राबविण्यात अपयश आले आहे.